व्हॉट्सअॅपच्या नव्या खास फिचरमुळे नंबर सेव्ह करण्याची कटकट संपणार


तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले लोकप्रिय मेसेंजर अॅप व्हॉट्सअॅप त्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनले असल्याचे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी नेहमीच अनेक नवनवीन फिचर्स लॉन्च करत असते. असे असतानाच या लोकप्रिय अॅपमध्ये लवकरच आणखी एका फिचरची भर पडणार आहे. ज्यामुळे युजर्स एकमेकांच्या अगदी सहज कनेक्ट राहू शकणार आहेत. लवकरच मोबाइलमध्ये नंबर सेव्ह करण्याची प्रोसेस व्हॉट्सअॅप आणखी सोपी करणार आहे.

याबद्दल अशी माहिती मिळत आहे की, गेल्या बऱ्याच दिवसांपासून व्हॉट्सअॅप QR code वर काम करत आहे. ज्यामार्फत अगदी सहज मोबाइल नंबर फोनमध्ये सेव्ह करणे शक्य होणार आहे. हे फिचर मोबाईलमध्ये आल्यामुळे व्हॉट्सअॅपवरील नंबर सेव्ह करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. दरम्यान, व्हॉट्सअॅपने यावर टेस्टिंग करत हे फिचर व्हॉट्सअॅप बीच्या यूजर्ससाठी गेल्या वर्षीच लॉन्च केले आहे. रिपोर्टनुसार, लवकरच हे फिचर सामान्य युजर्ससाठीही लॉन्च करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅपच्या वतीने सर्व युजर्सना एक युनिक QR code देण्यात येणार आहे. ज्याला दुसरे युजर्स आपल्या स्मार्टफोनने स्कॅन करून त्यांचा नंबर सेव्ह करू शकणार आहेत. यासाठी युजर्सच्या प्रोफाइलमध्ये व्हॉट्सअॅप एक QR code देणार आहे. युजर्स अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन या code ला पाहू शकणार आहेत. Settings मध्ये प्रोफाइल नेम आणि फोटोसोबत QR code चा पर्याय युजर्सना देण्यात येणार आहे. या QR code वर क्लिक केल्यावर My code नावाचा एक टॅब युजर्सच्या समोर ओपन होणार आहे. ज्याला युजर्स दुसऱ्यांसोबत शेअरही करू शकणार आहेत. ज्यानंतर SCAN codeचा ऑप्शनही समोर येणार आहे. जो दुसरे युजर्स आपल्या फोन कॅमेऱ्याच्या मदतीने स्कॅन करून त्या युजरचा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करू शकणार आहेत.