भाजप नेत्यांच्या ‘संस्कारा’वरुन रोहित पवारांचा टोला


मुंबई – हाथरसमधील सामूहिक अत्याचाराच्या घटनेवर देशभरात जनक्षोभ उमटत असतानाच काल उत्तर प्रदेशातील भाजप आमदारांने बलात्कार थांबवण्यासाठी मुलींवर संस्कार करणे गरजेचे असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता त्यांच्या या वक्तव्यावरून वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत असून, यावरून भाजपला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही टोला लगावला आहे.


भाजप आमदाराने उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या संदर्भानं बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात, असे बलियाचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भाजप आमदाराने केलेल्या वक्तव्याच्या हवाला देत भाजपला लक्ष्य केले आहे. रोहित पवार यांनी एक ट्विट करत मुलींवर चांगले संस्कार केले, तर बलात्कार होणार नाहीत, असे बेताल वक्तव्य उत्तर प्रदेशातील भाजपच्या एका आमदार महाशयांनी केले. एकीकडं आपल्या महान भारतीय संस्कृतीचा गौरव जगभरात होत असताना अशा लोकप्रतिनिधींकडून तोडल्या जाणाऱ्या ताऱ्यांमुळे त्यांच्यावरील संस्कारांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होत, असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे.