भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनाही त्यांच्या पक्षाने एकटे पाडले – प्रताप सरनाईक


मुंबई: शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात टीका करणारे लोक आता गायब झाले आहेत. त्याचबरोबर प्रवक्ते राम कदम यांनाही त्यांच्या भाजपने एकटे पाडले आहे, असे वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केले. मुंबईत ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात शिवसेनेविरोधात आरोपांची राळ उडवून देणाऱ्या आमदार राम कदम आणि इतर भाजप नेत्यांचा यावेळी समाचार घेतला.

प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात शिवसेनेविरोधात आरोपांची राळ उडवून देणारे भाजपचे प्रवक्ते राम कदम यांना त्यांच्याच पक्षाने एकटे पाडले आहे. ‘एम्स’ने सुशांतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्याच केली होती, असा अहवाल दिल्यानंतर आता सगळे टीकाकार कुठे गेले? तसेच गुप्तेश्वर पांडे नावाचा अधिकारी कुठे गेला?, असा सवाल सरनाईक यांनी विचारला. बिहारमधील विधानसभा निवडणूक गुप्तेश्वर पांडे लढवणार आहेत. पण ते ‘एम्स’च्या अहवालामुळे ‘उघडेश्वर पांडे’ झाले असल्याची टीकाही प्रताप सरनाईक यांनी केली.

तसेच यावेळी मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे देखील प्रताप सरनाईक यांनी कौतुक केले. कुठल्या कलाकारांसोबत सुशांत सिंह याचे संबंध होते, याची माहिती मुंबई पोलिसांनाही होती. परंतु, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याविषयी वाईट गोष्टी सांगायच्या नसतात, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले.