जनधन खात्यात ‘झिरो बॅलन्स’ असला तरीही अशा पद्धतीने तुम्हाला मिळू शकतात 5000 रुपये


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकिंग प्रणालीशी प्रत्येक गरीब व्यक्तीला जोडण्यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना सुरु केली होती. त्याअंतर्गत देशातील कोट्यावधी नागरिकांची खाती उघडण्यात आली. शासकीय अनुदान, पेन्शन आणि इतर लाभ या योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांमध्ये थेट हस्तांतरणाच्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात.

झिरो बॅलन्सवर या योजनेंतर्गत खाते उघडले जाते. या खात्यात महिला, मुले आणि कुटुंबप्रमुख आपल्या मेहनतीतून कमावलेली रक्कम बचत म्हणून ठेवू शकतात. हे खाते आता कोरोना संकटात आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. कारण झिरो बॅलन्स रकमेवर देखील या खात्याच्या माध्यमातून 5 हजार रुपयांची ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते.

जनधन खात्यावर उपलब्ध असलेल्या या सुविधेचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर आपले आधार कार्ड तुम्हाला बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. जर तसे नसेल तर आपल्याला या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. त्याचबरोबर मागील 6 महिन्यांत आपण आपल्या जनधन खात्यातून व्यवहार केलेले असावेत. आपण जर जनधन खातेदार असाल आणि या दोन्ही अटी पूर्ण केल्यास तुम्ही ओव्हरड्राफ्टच्या सुविधेसाठी अर्ज करू शकता.

तुम्ही खाते उघडल्यानंतर केवळ 1 किंवा 2 वेळेसच व्यवहार केले असतील तर बँक आपल्याला ओव्हरड्राफ्ट सुविधा देण्यास नकार देऊ शकते. म्हणजेच, ज्या ग्राहकांच्या बँक खात्याचे व्यवहार चांगले आहेत आणि खात्यातून व्यवहार होत आहेत असे ग्राहक सहजपणे ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकतात.