अमेरिकेच्या अध्यक्षांचे आजार लपविण्याचा इतिहास जुनाच

फोटो साभार सीजीटीएन अमेरिका

अध्यक्षांचा आजार लपविण्याचा अमेरिकेचा इतिहास खूप जुना आहे. अनेक अध्यक्षांच्या बाबतीत हा प्रकार घडला असल्याचे उघडकीस आले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोना संसर्ग झाल्याची आणि त्यांची तब्येत चांगली असल्याची बातमी त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून म्हणजे व्हाईट हाउस मधून देण्यात आली होती. त्यांना करोनाचा किरकोळ संसर्ग झाल्याचे यात म्हटले गेले होते मात्र शुक्रवारी ट्रम्प यांची तब्येत अधिक बिघडल्याची बातमी मात्र लपविली गेली होती. ट्रम्प यांची प्रकृती शुक्रवारी खालावली होती आणि त्यांची ऑक्सिजन पातळी सतत घसरू लागल्याने गंभीर परिस्थिती उद्भवली होती. त्यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु असून रेमदेसिवीरचा दुसरा डोस त्यांना दिला गेला आणि त्यानंतर आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे समजते.

अमेरिकेचा या विषयाचा इतिहास पाहिला तर अध्यक्षांचे आजार लपवून ठेवण्याची मोठी परंपरा येथे दिसते. १८४१ साली तेव्हाचे अध्यक्ष विलियम हॅरियन न्युमोनियाने आजारी पडले पण ही माहिती बाहेर येऊ दिली गेली नव्हती. अखेरी ९ दिवसात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी महिनाभर त्यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली होती.

१९१९ मध्ये तेव्हाचे अध्यक्ष वूड्रो विल्सन एप्रिल मध्ये पॅरीस येथे गेले होते आणि तेथे ते आजारी पडले. त्यांचे डॉक्टर कॅरी ग्रेसन यांनी रात्रभर त्यांची देखभाल केली आणि अखेरी अध्यक्ष गंभीर आजारी असल्याची माहिती व्हाईट हाउसला दिली. विल्सन स्पॅनिश फ्ल्यूने आजारी पडले होते. या साथीने अमेरिकेत ६ लाख ७५ हजार नागरिक मृत्युमुखी पडले होते. १९४४ मध्ये रूझवेल्ट याना उच्च रक्तदाब आणि हृदय विकाराचा त्रास होऊ लागला होता. पण तेव्हा निवडणुका असल्याने त्यांच्या आजाराची माहिती लपविली गेली होती. रूझवेल्ट निवडणूक जिंकले पण त्यानंतर महिन्यात त्यांचे निधन झाले होते.

राष्ट्रपती ग्रोव्हर यांना तोंडाचा कर्करोग झाला होता मात्र त्यांचा हा आजार लपविला गेला होता. ग्रोव्हर यांनी एका खासगी जहाजात तोंडचे ऑपरेशन करून घेतले होते. आपला अध्यक्ष कॅन्सरने आजारी आहे असे कळले तर नागरिक त्यांना कमजोर मानतील अशी भीती त्यांच्या मनात होती असे सांगितले जाते.