अमेरिकी निवडणुकीत यंदा हिंदी प्रचार घोषणा

फोटो साभार दैनिक भास्कर

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत यंदा भारतीय आणि दक्षिण आशियाई मतदाराना आकर्षित करण्यासाठी कोणतीही संधी राजकीय पक्ष सोडत नसल्याचे दिसून आले आहे. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोघेही भारतीय मतदारांना रिझविण्यासाठी यंदा प्रचारात हिन्दी घोषणा वापरत असून’ अमेरिकन नेता कैसा हो, बायडेन जैसा हो आणि अबकी बार ट्रम्प सरकार’ या दोन घोषणा अमेरिकन टीव्ही, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत.

विशेष म्हणजे यंदा प्रथमच दोन्ही पक्ष भारतीयांचा विचार करून कॅम्पेन लाँच करताना दिसत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि सध्याचे राष्ट्रपती डोनल्ड ट्रम्प यांनी तर भारताचे पंतप्रधान मोदी यांची मैत्री कॅश करून भारतीय समुदायाची मते मिळविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन यांच्या टीमने १४ भारतीय भाषांत रेडिओ, टीव्ही कॅम्पेन बनविली आहेत. हिंदू अमेरिकन्स व्होट फॉर बायडेन ला हिंदू व्होट्स फॉर ट्रम्प कॅम्पेनने उत्तर दिले जात आहे.

या निवडणुकीत हिंदी घोषणा देण्यामागे अमेरिकेत चार नंबरचा मोठा धर्म हिंदू असल्याचे कारण दिले जात आहे. अमेरिकेच्या लोकसंख्येत या हिंदू धर्मियांची भागीदारी १ टक्का आहे. वेळोवेळी होत असलेल्या सर्व्हेक्षणात मोदी यांची मैत्री ट्रम्प यांच्यासाठी फायद्याची ठरू शकेल असे दिसून आले आहे. ताज्या सर्व्हेक्षणात ६६ टक्के भारतीय बायडेन यांच्याबाजूने तर २८ टक्के ट्रम्प यांच्या बाजूने असल्याचे दिसून आले आहे. यामुळे बायडेन समर्थकांची काळजी वाढली आहे.

गेल्या निवडणुकीत ७७ टक्के भारतीय वंशीयानी हिलरी याना पाठींबा दर्शविला होता तर ट्रम्प याना १६ टक्के लोकांचा पाठींबा होता. अमेरिकेत २० लाख भारतवंशीय मतदार असून अमेरिकेच्या काही राज्यात हे भारतीय निर्णायक ठरू शकतात असे सांगितले जात आहे.