धनुष्यबाण चिन्हाविना शिवसेना बिहार निवडणूक लढविणार

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना किमान ५० जागा लढविणार आहे. मात्र या निवडणुकीत शिवसेना त्यांचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरू शकणार नाही. त्यामुळे शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे नवे चिन्ह मिळविण्यासाठीचा अर्ज केला असून त्यासाठी तीन पर्याय दिले आहेत असे समजते. बिहार शिवसेना प्रमुख कौशलेन्द्र शर्मा यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

शर्मा म्हणाले बिहार मधील सत्तारूढ जनता दल युनायटेडने २०१९ लोकसभा निवडणूक दरम्यान त्यांचे निवडणूक चिन्ह शिवसेनेच्या धनुष्य बाण चिन्हांशी मिळते जुळते असल्याने ते चिन्ह शिवसेनेला दिले जाऊ नये असा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला होता आणि तेव्हा आयोगाने आमचे चिन्ह जप्त केले होते. झारखंड मुक्ती मोर्चाचे चिन्ह सुद्धा आमच्या निवडणूक चिन्हांप्रमाणेच आहे.

या निवडणुकीत शिवसेना एकाही गुन्हेगारी आरोप असलेल्या उमेदवाराला तिकीट देणार नसल्याचे स्पष्ट केले गेले आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राउत पटना येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. बिहार शिवसेना गटाने निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्राचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे याना बिहार येथे पाठविण्याची मागणी केली आहे. ५० उमेदवारांची यादी संजय राउत यांच्या कडे सोपविली गेली असल्याचेही सांगितले जात असून यंदा महिला उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले गेल्याचे समजते.

शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या कडे बिहार निवडणुकीची महत्वाची जबाबदारी सोपविली गेल्याचे शर्मा यांनी सांगितले.