करोनाची भीती मागे सारून खादी ग्रामोद्योगची तुफानी विक्री

म.गांधी जयंती निमित्त दोन ऑक्टोबर रोजी करोनाची भीती विसरून ग्राहकांनी यंदाही तुफान खरेदी केल्याचे दिसून आले आहे. दिल्ली येथील कॅनोट प्लेस मध्ये असलेल्या खादी इंडिया आउटलेट मध्ये या एका दिवसात १ कोटी २ लाख १९४९६ रुपयाची खरेदी ग्राहकांनी केल्याचे समजते. यंदा करोना मुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले असतानाही ग्राहकांनी खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी याच आउटलेटने १ कोटी २७ लाख रुपयाची विक्री केली होती.

सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार या दुकानाबाहेर करोनाचा प्रभाव ओसरला नसतानाही २ ऑक्टोबरला सकाळपासून ग्राहकांनी रांग लावली होती. त्यात सर्व वयोगटातील ग्राहक होते. गांधी जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे २० टक्के सुट दिली जात होती. त्यामुळे विक्री वाढली.

पंतप्रधान मोदी सातत्याने खादी वापरावी यासाठी नागरिकांना आवाहन करत आहेत आणि त्याचा मोठा फायदा विक्री वाढीसाठी होत आहे. युवक वर्गात खादीची लोकप्रियता वाढली आहे. लॉकडाऊन काळात देशातील सर्व व्यवहार बंद असतानाही खादी ग्रामोद्योग व्यवसाय देशभर सुरु होता. त्यात फेस मास्क, हँडवॉश, सॅनिटायझर अश्या वैयक्तिक स्वच्छता वस्तूंना मोठी मागणी होती.