काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यावर पहिले हे तीन काळे कायदे कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून देऊ – राहुल गांधी


नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी रविवारी पंजाबमध्ये नवीन कृषी कायद्यांवर निषेध नोंदवणार्‍या शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी दाखल झाले. राहुल म्हणाले की या कायद्यांची अंमलबजावणी कोविड महामारीच्या काळात करण्याची काय गरज होती? त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देताना म्हणाले, जेव्हा काँग्रेस सत्तेत येईल तेव्हा आम्ही हे तीन काळे कायदे रद्द करून कचर्‍याच्या डब्यात फेकून देऊ.

राहुल गांधी तीन दिवस येथे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर रॅली करणार आहेत. राहुल गांधी यांच्यासमवेत मोगामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि नवज्योतसिंग सिद्धू उपस्थित होते. राहुल गांधी पुढे म्हणाले या कायद्याविषयी सभागृहात उघडपणे चर्चा का करण्यात आली नाही? त्याचबरोबर जर एखादा कायदा तुम्हाला अंमलात आणायचा असेल तर तुम्ही आधी राज्यसभा आणि लोकसभेत यावर चर्चा केली पाहिजे होती. पंतप्रधानांचे म्हणणे आहे की, हे विधेयक शेतकर्‍यांसाठी तयार करण्यात आले आहे. जर तसे असेल तर सभागृहात यावर उघडपणे चर्चा का झाली नाही. जर या कायद्यांमुळे शेतकरी खूश असेल, तर तो याविरोधात आंदोलन का करीत आहे. पंजाबमधील प्रत्येक शेतकरी या विधेयकाला विरोध का करत आहे. मोगा येथील रॅलीपूर्वी राहुल म्हणाले की, हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असून या कायद्याच्या मदतीने 23 अब्जाधीशांची नजर शेतकऱ्यांच्या जमिनी व पिकांवर आहे. सध्याच्या व्यवस्थेत काही त्रुटी आहेत. त्या बदलण्याची गरज आहे, पण ती नष्ट करण्याची गरज नाही. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नष्ट करायचे आहे.