दीपिकासह इतर अभिनेत्रींची चौकशी करणाऱ्या एनसीबी उपसंचालकांना कोरोनाची लागण


मुंबई – सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनचा तपास करणारे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांना कोरोनाची बाधा झाली असून केपीएस मल्होत्रा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंबईहून दिल्लीला गेले आहेत.

बॉलिवूडमधील अनेक नावे सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनचा तपास करताना समोर आली. त्याचबरोबर एनसीबीच्या रडारावर बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चेहेरे आहेत. नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि इतर अभिनेत्रींची एनसीबीच्या टीमने चौकशी केली होती. केपीएस मल्होत्रा एनसीबीच्या या टीमचे नेतृत्व करत आहे. शनिवारी रात्री केपीएस मल्होत्रा यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

एनसीबीने २६ सप्टेंबर रोजी दीपिकाची साडेपाच तास चौकशी केली. दीपिकाला या चौकशीदरम्यान रिया अथवा सुशांत प्रकरणावर एकही प्रश्न विचारण्यात आला नाही. दीपिकाला एनसीबीने करिश्मासोबतच्या चॅटिंगबद्दल प्रश्न विचारले. या चौकशीदरम्यान दीपिकाने ड्रग्सचे सेवन केल्याचे नाकारले. त्याचबरोबर व्हॉट्सअॅप चॅट खरे असल्याची कबुली दिली.