ममता बॅनर्जींची कबुली; बंगालमध्ये कोरोना ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’च्या स्तरावर पोहोचला


कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात कोरोना व्हायरस कम्युनिटी ट्रान्समिशन स्तरावर पोहोचला असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजनाचा उत्सव सुरू होणार आहे, यापूर्वी ममता बॅनर्जीची कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे.

आम्ही सध्या कोरोना महामारीच्या संकटात असून कोरोनामुळे आमच्या तीन आमदारांचे निधन झाले. देशात किती लोकांचा मृत्यू झाला, याबाबत माहिती नाही. पण पश्चिम बंगालमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन होत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेविरोधात कोलकात्यामध्ये निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तृणमूल काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. पण या मोर्चात सहभागी होणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी मास्क लावले नसल्यामुळे कोरोनाबाबत भाष्य करत ममता बॅनर्जी यांनी राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशन झाल्याचे म्हटले आहे.

याचबरोबर, ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूजनापूर्वी चिंता व्यक्त केली आहे. एवढी काळजी व सुरक्षा घेऊन सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्याचबरोबर ममता बॅनर्जी भाजपार निशाणा साधत म्हणाल्या, आम्ही गेल्या काही महिन्यांत कोरोनामुळे कोणतेही मोर्चे काढलेले नाहीत. केवळ भाजप मेळावे घेत असून सतत द्वेष व कोरोना पसरवत आहेत.