आरोग्यमंत्र्यांचा खुलासा; भारतातील २५ कोटी लोकांना २०२१ च्या जुलैपर्यंत देणार कोरोनाची लस


नवी दिल्ली – संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असून ही महामारी कधी संपुष्टात येणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागलेले आहे. जगभरात कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर जगभरात १५० हून अधिक लसींवर संशोधन आणि चाचणी सुरू आहे. भारतात कोरोना प्रतिबंधक लसीची २/३ टप्प्यातील चाचणी सुरू आहे. भारतीय वैज्ञानिकांनी यांपैकी दोन लसी या विकसित केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन ‘संडे संवाद’ या कार्यक्रमाद्वारे आज कोरोना लसीसह महत्त्वाची माहिती दिली आहे. भारतातील कोट्यवधी लोकांपर्यंत जुलै २०२१ पर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार याची सविस्तर माहिती आज आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. भारतात ४०० ते ५०० दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना आहे. पुढच्या वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत साधारणपणे भारतातील २० ते २५ कोटी लोकांना ही लस देण्याचे लक्ष्य आहे. ही लस सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबर अखेरपर्यंत सूचना मागवल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.