सणांच्या दिवसात रेल्वेच्या २०० जादा गाड्या धावणार

करोना प्रकोपामुळे प्रवासाची सर्व साधने बंद केली गेली होती मात्र आता देशात अनलॉकची पाचवी फेज सुरु झाली असून आगामी दिवस सणांचे दिवस असल्याचे लक्षात घेत रेल्वेने या काळात २०० विशेष गाड्या सोडण्याची तयारी केली आहे. भारतीय रेल्वेने या गाड्या १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या काळात सोडल्या जातील असे जाहीर केले आहे. रेल्वे बोर्ड अध्यक्ष आणि सीईओ तर्फे जाहीर केलेल्या निवेदनानुसार प्रवासी सुरक्षा लक्षात घेऊन या २०० विशेष रेल्वे सोडल्या जात असल्याचे म्हटले गेले आहे. त्याचबरोबर गरज भासल्यास अधिक गाड्या सोडण्याची तयारी सुद्धा केली गेल्याचे समजते.

या गाड्या सोडताना करोना संक्रमण परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यानुसार पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. ज्या मार्गावर अधिक मागणी आहे त्या रूटवर जास्त गाड्या धावतील. प्रवासासाठी ज्या रूटवर अधिक प्रतीक्षा यादी आहे तेथे क्लोन ट्रेन धावणार आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीवर प्रवासी आहेत अशी वेळ येणार नाही. रेल्वे विभागाने आत्तापर्यंत ४० क्लोन ट्रेन चालविल्या आहेत.

दिवाळीपूर्वी तेजस ही पहिली खासगी ट्रेन सुरु होईल असेही सांगितले जात आहे. त्यासाठी आयआरसीटीसीने ही ट्रेन १८ ऑक्टोबर पासून सुरु करण्याची परवानगी संबंधित विभागाकडे मागितली असल्याचे समजते.