डोनाल्ड ट्रम्प आर्मी हॉस्पिटल मध्ये दाखल

अमेरिकेचे अध्यक्ष आणि फर्स्ट लेडी मेलेनिया कोविड १९ संक्रमित झाल्याचा रिपोर्ट आल्यानंतर ट्रम्प याना उपचारासाठी वॉल्टर रीड आर्मी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. ट्रम्प तेथूनच सरकारी कामकाज करणार आहेत. ट्रम्प यांना कोविड १९ ची बाधा झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले असून त्यांना थोडा ताप येत आहे. मात्र डॉक्टरांनी ट्रम्प आणि मेलेनिया यांची प्रकृती चांगली असून काळजीचे कारण नसल्याचे म्हटले आहे.

मिडिया मध्ये शुक्रवारी ट्रम्प हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यासाठी जात असताना पायी चालत मरिन वन मध्ये बसण्यासाठी गेल्याचे फोटो प्रसिध्द झाले आहेत. ट्रम्प आणि मेलेनिया यांच्यात करोनाची हलकी लक्षणे दिसत आहेत मात्र नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकांचे काम ट्रम्प सुरु ठेवणार आहेत. त्या संदर्भात त्यांनी एक छोटा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या संदेशात त्यांनी समर्थकांचे आभार मानले आहेत.

७४ वर्षीय ट्रम्प यांनी ट्विटरवरून ते आणि फर्स्ट लेडी मेलेनिया करोना बाधित झाल्याचा रिपोर्ट आल्याचे सांगून दोघांचीही तब्येत चांगली असल्याचे म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून ट्रम्प आणि मेलेनिया याना लवकर बरे व्हा असा संदेश दिला आहे. ट्रम्प यांचे या काळातील सर्व दौरे आणि कार्यक्रम रद्द केले गेले आहेत.