३१ ऑक्टोबर रोजी आकाशात दिसणार ब्ल्यू मून

जगभरातील वैज्ञानिक आणि खगोल संशोधक यंदाच्या ३१ ऑक्टोबरची प्रतीक्षा करत आहेत. या दिवशी जगातील बहुतेक ठिकाणी सुखद ब्ल्यू मूनचे आकाशात दर्शन होणार आहे. ब्ल्यू मून ही दुर्मिळ घटना मानली जाते. अर्थात ब्ल्यू मून दिसणे ही फारशी दुर्मिळ घटना नसली तरी एकाचवेळी जगभर ब्ल्यू मून दिसणे ही घटना दुर्मिळ आहे. यापूर्वी दुसरे महायुद्ध सुरु असताना जगभर एकच वेळी ब्ल्यू मून दिसला होता. त्याला आता ७६ वर्षे लोटली आहेत.

यावेळचा ब्लू मून उत्तर, दक्षिण अमेरिका, भारत, आशिया आणि युरोप मधील अनेक देशात दिसणार आहे. या पूर्वी ब्लू मून वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया वेळी पाहिला गेला आहे. अर्थात ब्ल्यू मून म्हणजे चंद्र निळा दिसत नसतो. तर एकाच महिन्यात दोन वेळा पौर्णिमा आल्या तर दुसऱ्या पौर्णिमेला दिसणारया चंद्राला ब्ल्यू मून म्हटले जाते. या नंतर ही संधी २०३९ मध्ये मिळणार आहे. २०२० मध्ये १ ऑक्टोबर रोजी पौर्णिमा होती आणि परत ३१ ऑक्टोबर रोजी पौर्णिमा आहे. त्यामुळे या वर्षात १२ ऐवजी १३ पौर्णिमा आहेत.