नवी दिल्ली: हाथरस प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाची नाकाबंदी न करता विरोधकांसह सर्व राजकीय नेते आणि माध्यम प्रतिनिधींना त्यांना भेटू द्या, अशी मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भरती यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरचा आहेर दिला आहे. रुग्णालयातून परतल्यावर आपण स्वतःही त्या कुटुंबाची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हाथरस प्रकरण: उमा भारतींकडून योगींना घरचा आहेर
करोनाबाधित असल्याने ‘एम्स’ रुग्णालयात दाखल असलेल्या उमा भारतींनी या प्रकरणाबाबत ट्विटची मालिकाच प्रसिद्ध करून योगी आणि उत्तरप्रदेश पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत.
ज्या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी सुरू आहे, त्या प्रकरणाशी संबंधित कुटुंबाला कोणाला भेटता येणार नाही, असा कोणताही कायदा नाही. पोलिसांनी ज्या प्रकारे पीडितेच्या कुटुंबाची नाकाबंदी केली आहे त्यावरून अनेक प्रश्न निर्माण होतात. दलित समाजातील पीडित युवतीवर पोलिसांनी ज्या घाई गडबडीत अंत्यसंस्कार उरकले त्यावरून आणि कुटुंबाला आणि हाथरस गावाला ज्या पद्धतीने बंदिस्त करून टाकले आहे, त्यावरून संशय निर्माण होत आहे, अशा शब्दात उमा भारतींनी पोलीस आणि मुख्यमंत्र्यांची कानउघाडणी केली आहे.
आपण स्वच्छ प्रतिमा असलेले मुख्यमंत्री आहात. हे प्रकरण आपण योग्य रितीने हाताळाल या विश्वासाने यावर भाष्य न करण्याचा आपला विचार होता. मात्र, ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत त्यावरून संशय निर्माण झाला आहे. या प्रकारांमुळे ‘एसआयटी’ चौकशीच संशयाच्या घेऱ्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी रामराज्याच्या दाव्याची आठवण करून देत अशा प्रकारांनी उत्तरप्रदेश सरकार आणि भाजपची प्रतिमा डागाळली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मी आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहे. आपली मोठी बहीण आहे. आपण माझी मागणी अमान्य करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.