साडेसात कोटीचे घड्याळ घालून मैदानात उताराला ‘क्ले कोर्ट’चा राजा


दीर्घ काळ टेनिसच्या खेळात आपले अधिराज्य गाजविणाऱ्या राफेल नदाफला ‘क्ले कोर्टचा राजा’ म्हणून संबोधले जाते. आपल्या या नामाभिधानाला साजेल अशा ‘फॅशन ऍक्सेसरीज’ परिधान करून राफेल अवतरला टेनिसच्या मैदानात. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेमध्ये रोनाल्ड गॅरोसच्या कोर्टमध्ये त्याने पाऊल ठेवले आणि त्याच्या मनगटावरच्या घड्याळाने चाहत्यांचे जणू डोळेच विस्फारले.

आजपर्यंत टेनिसच्या मैदानात कोणी परिधान केले नव्हते इतके महागडे घड्याळ राफेलने घातले होते. किंमत फक्त साडेसात कोटी रुपये! राफेलचे प्रायोजक असलेल्या ‘रिचर्ड मिली’चे ते घड्याळ होते. काळ्या रंगाची केस, गुलाबी रंगाची डायल आणि निळ्या रंगाचा पट्टा असलेल्या या घड्याळाच्या बाजूला ‘RAFA’ ही अक्षरे. या घड्याळाची रंगसंगती राफेलच्या मैदानातील पेहेरावाशी सुसंगत अशीच होती. आणि टेनिसच्या रॅकेटशी नाते सांगणारी एकमेकांमध्ये गुंफलेली स्टीलची साखळीही!

मागील काही काळापासून टेनिसच्या कोर्टवर खेळातीळ कौशल्याच्या प्रदर्शनाबरोबरच फॅशन आणि स्टाईलचे प्रदर्शनही प्रेक्षकांना घडत आहे आणि अर्थातच कंपन्याही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याचा पुरेपूर वापरही करून घेत आहेत.