ममतादीदींची गळाभेट घेऊ इच्छिणाऱ्या भाजप नेत्याला करोना

फोटो साभार झी न्यूज

करोना लागण झाली तर प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याना गळामिठी घालेन अशी धमकी देणारे भाजप नेते अनुपम हाजरा यांची करोना टेस्ट पोझिटिव्ह आली असल्याचे समजते. हाजरा याना शुक्रवारी करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्याची करोना चाचणी केली गेली होती.

हाजरा यांची भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून नुकतीच नेमणूक केली गेली आहे. त्यावेळी ते म्हणाले होते आमचे कार्यकर्ते करोना पेक्षाही भयानक शत्रूशी म्हणजे ममतादिदिंशी लढत आहेत. जर ते विना मास्क दिदिंशी लढू शकतात तर विना मास्क करोना विरुध्द सुद्धा लढू शकतील. याच वेळी हाजरा यांनी जर त्यांना करोना संक्रमण झाले तर ममता दिदिना गळामिठी मारणार असल्याचे वक्तव्य केले होते.

त्याच्या या विधानावर तृणमुल कॉंग्रेसने त्यांच्या विरोधात सार्वजनिक नेत्याची प्रतिमा मलीन केल्याची आणि घटनेचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल केली होती.