बुर्ज खलीफावर उजळली बापूजींची प्रतिमा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून दुबईच्या जगातील सर्वात उंच इमारतीवर- बुर्ज खलीफावर बापूजींची प्रतिमा २ ऑक्टोबरला उजळली आणि ती पाहण्यासाठी हजारो भारतीयांच्या समवेत अनेक नागरिकानी एकच गर्दी केली होती. जगातील या सर्वात उंच इमारतीवर उजळलेल्या बापूंच्या प्रतिमेची सर्वाना मोहिनी पडली होती.

२ ऑक्टोबर रोजी म.गांधी यांची जयंती देशात साजरी होते आणि हा दिवस जगभरात अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. गेल्या वर्षी सुद्धा या दिवशी गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त बुर्ज खलीफावर बापूजींची प्रतिमा आणि त्यांचे संदेश रंगीत दिव्यांच्या माध्यमातून उजळले गेले होते.

गेली अनेक वर्षे भारताच्या स्वातंत्रदिनी म्हणजे १५ ऑगस्ट ला बुर्ज खलीफा इमारतीवर रंगीत दिव्याच्या माध्यमातून आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा चमकून उठत आहे. भारत आणि युएई या दोन देशातील परस्पर संबंध गेले काही वर्षे अधिक दृढ होताना दिसत आहेत. जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयविरुद्ध पाकिस्तान जेव्हा जागतिक समुदायाला भारताविरुध्द भडकविण्याचा प्रयत्न करत होता तेव्हाही युएईने भारताच्या बाजूने उभे राहताना काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याची भूमिका घेतली होती.