शिव्या देणाऱ्या फाजील पोपटांची हकालपट्टी

फोटो साभार वर्ल्ड टुडे

कोविड १९ महामारी मध्ये जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा शब्द कदाचित क्वारंटाइन हाच असेल. कोट्यवधी लोकांना क्वारंटाइन होण्याचा अनुभव मिळाला असेल. या काळात माणसाच्या वर्तणुकीत काय बदल होतात यावर कदाचित संशोधने सुरु असतील. पण या क्वारंटाइन काळात पोपटांवर झालेला परिणाम पूर्व इंग्लंडच्या लिंकनशायर वाईल्डलाईफ पार्क झु साठी डोकेदुखी ठरला आहे.

पोपट हा घरात पाळल्या जाणाऱ्या पक्षांमध्ये आवडता पक्षी आहे. पोपट गोड बोलतो, गाणी म्हणतो यामुळेही कदाचित त्याला लोकप्रियता मिळाली असेल. पण वरील झु मधील पाच पोपट क्वारंटाइन मधून बाहेर आल्यापासून येणारया जाणाऱ्या प्रेक्षकांना अश्लील शिव्या देऊ लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत कुणाचाही अपवाद हे पोपट करत नसल्याचे समजते.

एरिक, जेड, टायसन, बिली आणि एल्सी अशी या पोपटांची नावे आहेत. पार्कचे अधिकारी सांगतात, हे पोपट वेगवेगळया लोकांनी झु कडे दिले आहेत. त्यामुळे त्यांना थोडेदिवस क्वारंटाइन केले गेले होते. तेथून बाहेर आल्यापासून हे पोपट शिव्या देऊ लागले आहेत. काही प्रेक्षकांनी सुरवातीला ते एन्जॉय केले पण नंतर मात्र तक्रारी सुरु झाल्या. अखेर या पोपटांची झु मधून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांना दुसरीकडे ठेवले जाणार आहे. त्यांची शिव्या देण्याची सवय सुटली तर त्यांना परत झु मध्ये प्रवेश दिला जाणार आहे असेही समजते.