नवे ‘एअर इंडिया वन’ भारतात दाखल

देशाच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान अश्या अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी अतिसुरक्षित मानल्या गेलेल्या एअरइंडिया वन ताफ्यातील पाहिल्या विमानाचे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले आहे. या ताफ्यासाठी बोईंग ७७७-३०० ईआर जातीची दोन विमाने बोईंग कंपनीकडून विकत घेतली गेली आहेत. त्यामुळे देशाच्या अतिमहत्वाच्या व्यक्ती यापुढे अभेद्य किल्ल्याप्रमाणे असलेल्या या विमानातून सुरक्षित प्रवास करू शकणार आहेत. सध्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान प्रवासासाठी बोईंग ७४७ जातीच्या विमानातून प्रवास करतात.

सध्याची विमाने एअर इंडियाचे पायलट चालवितात आणि विमानांची देखभाल एअरइंडिया कडून केली जाते. नवी विमाने इंडिअन एअरफोर्सचे पायलट चालविणार आहेत. नवी विमाने अॅडव्हान्स कम्युनिकेशन सिस्टीम सह आहेत. या विमानातून प्रवास करताना हवेत सुद्धा हॅक न होता ऑडीओ व्हिडीओ कम्युनिकेशन करता येणार आहे. या विमानांवर मिसाईल हल्ल्याचा परिणाम होणार नाही.

या विमानात हवेतच इंधन भरता येण्याची सुविधा आहे शिवाय मिसाईल अॅप्रोच सिस्टीम असून पायलट सेन्सरच्या मदतीने विमानाच्या दिशेने येणाऱ्या मिसाईलवर हल्ला करू शकेल. शत्रूच्या जीपीएस, ड्रोन सिग्नल ब्लॉक करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वायर फेस जॅमर, इन्फ्रारेड मिसाईल डायरेक्शनल इन्फ्रारेड काउंटर सिस्टीम असून रडार ट्रॅकींग मिसाईलला धोका देण्यासाठी चाफ सोडता येतात. यामुळे विमान लपले जाते. मिसाईल हल्ला परतविण्यासाठी मिरर बॉल सिस्टीम आहे. या विमानाचा वेग ताशी ९०० किमी असून त्याला सफेद, फिकट निळा आणि मध्ये केशरी पट्टा असा रंग दिला गेला आहे.

बोईंग ७७७-३०० ईआर जातीच्या दोन विमानांची किंमत ८४५८ कोटी रुपये आहे.