चीनी राष्ट्रीय दिन सुट्टी, प्रवासास प्रचंड संख्येने बाहेर पडले नागरिक

फोटो साभार चायना प्लस

सर्व जगभरातील देशांना करोना महामारीची भेट देऊन त्यांना जखडून ठेवलेल्या चीनमध्ये मात्र नागरिक खुलेपणाने सुटी आणि प्रवासाचा आनंद लुटताना दिसत आहेत. गुरुवारी १ ऑक्टोबर पासुन देशात देशस्थापना सप्ताह साजरा करण्याची सुरवात झाली आहे. या निमित्ताने नागरिकांना आठवडाभर सुट्टी दिली गेली असून गुरुवारी देशाचा ७१ वा स्थापना दिवस साजरा केला गेला.

चीनी सरकारी वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या सुटीच्या आठवड्यात सुमारे ६० कोटी चीनी प्रवास करणार असून पहिल्या दिवशी साडेतीन कोटी लोकांनी प्रवास केला आहे. या काळात देशातील अनेक स्मारके, पर्यटनस्थळे सजविली गेली असून ती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. पहिल्या दिवशी १.८ कोटी नागरिकांनी रेल्वेने, १.२ कोटी नागरिकांनी विमानाने तर ५० लाख नागरिकांनी स्वतःच्या वाहनाने प्रवास केल्याचे सांगितले जात आहे.

१९१२ मध्ये क्विंग राजशाहीचा अंत झाल्यावर पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना झाली. या दिवसापासून चीनचा आधुनिक इतिहास सुरु झाला. १९३६ मध्ये जपानच्या हल्ल्याचा चीनने खंबीरपणे मुकाबला केला. दुसरे महायुद्ध संपत आले तेव्हा १९४५ मध्ये जपानने शरणागती पत्करली. तेव्हा चीनमध्ये कम्युनिस्ट आणि राष्ट्रवादी यांच्यात युध्द पेटले. चार वर्षे सुरु राहिलेल्या या सिव्हील वॉर मध्ये लाखो लोक मारले गेले होते. त्यानंतर १ ऑक्टोबर १९४९ मध्ये माओ त्से तुंग याने कम्युनिस्ट पार्टीच्या विजयाची घोषणा केली आणि देशाचे नाव घटनेत बदल करून पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना असे केले गेले होते. त्यामुळे हा दिवस देशात उत्साहात साजरा केला जातो.