चाखून बघणार हा किंग कोब्रा?

जगभरातील शेफ विविध प्रकारचे पदार्थ बनवून त्यांचे कौशल्य जगासमोर सादर करत असतात. सोशल मीडियामुळे जगभर पोहोचणे त्यांना सहज शक्य झाले आहे आणि त्यामुळे आपल्यालाही घरबसल्या जगभरातील शेफ्सची कलाकारी पाहता येते आहे. अमेरिकेच्या लासवेगास येथील अॅम्युरी गुईचान चॉकलेटच्या विविध आकृती बनविण्यात माहीर असून त्या बनत असतानाचे व्हिडीओ तो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. त्याचे अडीच लाखाहून अधिक फॉलोअर आहेत.

किंग कोब्रा नुसता दुरून पाहिला तरी अनेकांची भीतीने गाळण उडते. मग तो खायची बातच नको. अॅम्युरीने चॉकलेटपासून अगदी खरा वाटेल असा किंग कोब्रा बनविला असून तो टेबलवर पाहून सुद्धा कुणी त्याच्या जवळ जायला धजत नाही. त्याने नुकताच एक पाच फुट उंचीचा टेलिस्कोप चॉकलेट पासून तयार केला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रथमदर्शनी हा टेलीस्कोप सोन्याचा किंवा अन्य धातूचा वाटतो पण तो पूर्ण चॉकलेटचाच आहे. अॅम्युरी म्हणतो, त्याच्या आयुष्यातील हे सर्वात मोठे टेक्निकल चॉकलेट क्रिएशन आहे. याचा प्रत्येक भाग चॉकलेट पासून बनला आहे.

अॅम्युरीने आत्तापर्यंत अंडे, कॉफी ग्राइंडर, गोरीला, ड्रॅगन, किंगकॉंग अश्या एकसो एक कलाकृती चॉकलेट मधून साकारल्या आहेत.