आयपीएल बायो बबल उल्लंघन केल्यास १ कोटीचा दंड होणार

फोटो साभार टाईम्स ऑफ इंडिया

आयपीएल स्पर्धेत खेळणारया खेळाडूंनी बायो बबलचे उल्लंघन केल्यास संबंधित खेळाडूला स्पर्धेबाहेर जावे लागेलच शिवाय टीमला १ कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे. शिवाय टीमचे टेबल पॉइंट कापले जाणार आहेत. बीसीसीआयने स्पर्धेत उतरलेल्या सर्व ८ फ्रेंचाईजी टीमना हा इशारा दिला असल्याचे समजते.

भारतात करोना संक्रमण वेगाने होऊ लागले होते त्यामुळे आयपीएलचे सामने यंदा युएई मध्ये खेळविले जात आहेत. त्यासाठी बीसीसीआयने सर्व संबंधितांसाठी बायो सिच्युअर बबल बनविले आहेत. त्यासाठी कडक नियम केले आहेत. त्यानुसार बायो बबलच्या बाहेर अनधिकृतरित्या कुणी खेळाडू प्रथमच गेला तर त्याला ६ दिवस क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. दुसऱ्यावेळी हाच प्रकार घडला तर खेळाडूला १ सामन्यासाठी निलंबित केले जाणार आहे आणि तिसऱ्या वेळी हाच प्रकार घडला तर खेळाडूला स्पर्धेबाहेर जावे लागेलच पण टीमला त्याच्या जागी दुसरा खेळाडू मिळू शकणार नाही.

खेळाडूचा रोजचा आरोग्य अहवाल पूर्ण करणे बंधनकारक केले गेले आहे. हा नियम मोडणे, जीपीएस ट्रॅक न घालणे, ठरलेल्या करोना तपासणीचे वेळापत्रक न पाळणे यासाठी ६० हजार रुपये दंड ठोठावला जाणार असून हा नियम खेळाडू परिवार सदस्य व टीम अधिकारी यांच्यासाठी लागू आहे.