भारत उभारणार स्वतःचे मोबाईल ऍप स्टोअर


गूगल आणि ऍपल प्लॅटफॉर्म्सला पर्याय म्हणून भारत आपले स्वतःचे मोबाईल ऍप स्टोअर उभारण्याच्या किंवा सध्या उपलब्ध असलेल्या भारतीय ऍप स्टोअरची क्षमता वाढविण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय तंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

भारतात सध्या तब्बल ५० कोटी लोक स्मार्टफोनचा वापर करतात. त्यापैकी बहुतेकांचे स्मार्टफोन्स गूगलच्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर चालणारे आहेत. मात्र, अनेक भारतीय ‘स्टार्ट अप्स’नी गूगलच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ही धोरणे आपल्या प्रगतीला खीळ घालत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. भारताचे स्वतःचे ऍप स्टोअर असावे अशी त्यांची मागणी आहे.

भारताचे आघाडीचे पेमेंट ऍप असलेल्या ‘पेटीएम’ला गूगलने आपल्या ऍप स्टोअरमधून काही तासांसाठी काढून टाकले होते. ‘पेटीएम’कडून गँबलिंग धोरणाचा भंग होत असल्याचा गूगलचा आक्षेप आहे. मात्र, ‘पेटीएम’ने या कारवाईचा निषेध केला आहे. आपल्या स्टोअरमधील ऍप्सद्वारे केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर ३० टक्के कमिशन आकारले जाईल आणि हे धोरण कटाक्षाने अमलात आणले जाईल, असा इशाराही गूगलने दिला आहे.

या पार्श्वभूमीवर भारत स्वतःचे ऍप स्टोअर विकसित करण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्यापूर्वी देशातील ऍप विकसित करणाऱ्या कंपन्यांकडून त्याला कितपत प्रतिसाद मिळेल याची चाचपणी केली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले. सध्याही भारतीय ऍप स्टोअर कार्यन्वित असून त्यात सुमारे १ हजार २०० ऍप्स उपलब्ध आहेत. मात्र, त्यामध्ये प्रामुख्याने शासकीय ऍप्सचा समावेश आहे. कमीतकमी सेवा शुल्क आकारणारे भारतीय ऍप स्टोअर असावे, अशी भारतीय ऍप विकासकांची मागणी आहे.