जीएसटी’ने गाठला ९५ हजार कोटींचा टप्पा


नवी दिल्ली: लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच आर्थिक व्यवहारांना चालना मिळाल्याने सप्टेंबर महिन्यात ‘जीएसटी’च्या महसुलाने ९५ हजार ४८० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. ‘जीएसटी’चे या आर्थिक वर्षातील हे सर्वाधिक संकलन आहे. मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न ४ टक्क्याने वाढले आहे. या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या उत्पन्नापेक्षा त्यात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात ‘जीएसटी’चे संकलन १ लाख ११ हजार कोटी रुपये होते. त्यानंतर या उत्पन्नाला उतरती कळा लागली. मार्च महिन्यात लॉकडाऊनच्या सुरुवातीला ९७ हजार ५९७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. एप्रिल महिन्यात त्याने ३२ हजार कोटी रुपयांचा तळ गाठला. मे महिन्यात हे उत्पन्न ६२ हजार कोटी रुपयांचे होते.

मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील जीएसटी संकलनाच्या तुलनेत यावर्षी राजस्थान (१७ टक्के), तामिळनाडू (१५ टक्के), आंध्र (८ टक्के), गुजरात (६ टक्के) या राज्यांमधून येणाऱ्या महसुलात वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशामधून मागील वर्षीएवढेच उत्पन्न मिळाले आहे तर कर्नाटकातून येणारे उत्पन्न मात्र ५ टक्क्यांनी घटले आहे.