गांधीजींना अभिवादन करताना राज ठाकरे यांचा राजकारण्यांना टोला


मुंबई: गांधीजींना केवळ प्रतिकांमध्ये अडकवून त्यांचे विचार दूर ठेवले जात आहेत. त्यांचा प्रांजळपणाचा गुण न घेता राजकीय सोयीप्रमाणे बोलणे अथवा मौन धारण करणे हे घातक आहे, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांनाही टोला लगावला आहे.

महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी ट्विट करून त्यांना अभिवादन केले. त्याच वेळी राजकारण्यांचे कानही टोचले आहेत.

करोना संकटाच्या काळात मोठ्या प्रमाणात घुसळण सुरू आहे. या काळात गांधीजींचे प्रांजळपणा आणि तटस्थपणाचे गुण अंगिकारले तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे राज ठाकरे यांनी नमूद केले आहे.

लाल बहादूर शास्त्री यांच्या कारकिर्दीबद्दल राज ठाकरे यांनी गौरवोद्गार काढले. लालबहादूर शास्त्रींची पंतप्रधानपदाची कारकीर्द केवळ २ वर्षांची. पण या २ वर्षात त्यांनी देशात धवलक्रांतीची, कृषीक्रांतीची बीज रोवली. पाकिस्तानच्या आक्रमकतेला सडेतोड उत्तर दिले. या राष्ट्रपुरुषाच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिवादन,’ असे त्यांनी म्हटले आहे.