… आता मोदी सरकार गप्प का: संजय राऊत यांचा सवाल


नवी दिल्ली: उत्तरप्रदेशात तरुणीबाबत घडलेली अत्याचार आणि खुनाची निर्दय घटना आणि त्याबाबत योगी सरकारची संशयास्पद भूमिका याबाबत मोदी सरकार गप्प का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राहुल व प्रियांका गांधी यांच्याशी उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेले वर्तन निषेधार्ह असल्याची टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या समस्या, सुरक्षितता आणि सन्मान याबाबत संवेदनशील आहेत. महिलांबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्याचे आपण अनेकदा पहिले आहे. तरीही हाथसरची निर्घृण घटना आणि उत्तर प्रदेश सरकारची त्याबद्दलची असंवेदनशील वृत्ती याबद्दल पंतप्रधान आणि त्यांचे सरकार गप्प का, असा सवाल त्यांनी केला.

राहुल गांधी हे काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचे पिता राजीव आणि आजी इंदिरा गांधी यांनी या देशासाठी बलिदान दिले आहे. असे असताना पोलिसांनी त्यांना आणि प्रियंका यांना दिलेली वागणूक निश्चितच अयोग्य आहे, असेही ते म्हणाले.

‘देशात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे,’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हाथसर प्रकरणी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. या प्रकरणात सरकार काहीतरी लपवत आहे, अशी टीका त्यांनी केली. उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्था शिल्लक नसल्याने मुख्यमंत्री टोगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राहुल आणि प्रियंका यांना दिलेल्या वागणुकीवरून योगी सरकारवर टीका केली आहे, तर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनीही योगींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने राज्यभरात आणि देशाच्या विविध भागातही आंदोलने करण्यात आली.