नवी दिल्ली: सत्य आणि अहिंसेची ताकद जगाला दाखवून देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा देतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. आपण जगात कोणालाही घाबरणार नाही. असत्याचा मुकाबला सत्याने करणार. असत्याचा विरोध करताना कितीही कष्ट सहन करावे लागले तरी त्याची पर्वा करणार नाही, अशा अर्थाचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
‘मैं दुनिया में किसी से नहीं डरूंगा… मैं किसी के अन्याय के समक्ष झुकूं नहीं, मैं असत्य को सत्य से जीतूं और असत्य का विरोध करते हुए मैं सभी कष्टों को सह सकूं।’
गाँधी जयंती की शुभकामनाएँ।#GandhiJayanti
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 2, 2020
कथित सामूहिक अत्याचार आणि खुनाच्या घटनेनंतर हाथरस येथे जाण्यासाठी निघालेल्या राहुल आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी नोएडा येथे अडविले. पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. जमावबंदीचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून राहुल, प्रियंका गांधींसह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले.
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी आलेल्या गांधी जयंतीचे औचित्य साधून राहुल यांनी सरकारला इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांनी गांधी तत्वज्ञानाचाच आधार घेतला आहे. सत्याची ताकद गांधीजींनी जगासमोर आणली. हिंसेने विरोध करण्यापेक्षा आत्मक्लेशाने प्रभावी परिणाम साधता येतो हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या याच तत्वांचा आधार घेत राहुल यांनी केलेल्या ट्विटमधून सरकारला इशारा देण्यात आला आहे.