अमेरिकेचे अध्यक्ष आणि फर्स्ट लेडी कोरोनाबाधित


वॊशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनाही करोनाने गाठले आहे. स्वतः ट्विट करून ट्रम्प यांनी या बाबत माहिती दिली आहे. आम्ही दोघेही विलगीकरणात असून लवकरच या आजारातून बाहेर पडू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

ट्रम्प यांचे निकटवर्ती होप हिक्स यांना करोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न होताच आपण अलगीकरणात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी नुकतेच जाहीर केले होते. मात्र, आता स्वतः करोनाबाधित झाल्याने त्यांना स्वतःला विलग करून घ्यावे लागले आहे.

यापूर्वी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाबाधित असल्याने आठवडाभर रुग्णालयात दाखल करावे लागले होते. जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूड्यू यांनी करोनाचा यशस्वी मुकाबला केला आहे.