राफेलचा दणदणाट, पॅरीसवासियात घबराट

फोटो साभार जागरण

फ्रांसची राजधानी पॅरीस मध्ये बुधवारी काही काळ नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. शहरावर बॉम्ब हल्ला झाला अश्या कल्पनेने घराबाहेर येऊन आकाशात नजर टाकणाऱ्या नागरिकांना राफेल लढाऊ विमान अति वेगाने आणि प्रचंड आवाज करून जाताना दिसले खरे पण हा हल्ला नव्हता तर एअर कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटलेल्या दोन प्रवासी विमानाच्या मदतीसाठी होता याचा खुलासा झाल्यावर नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

मिळालेल्या माहितीनुसार राफेल लढाऊ विमानाने साऊंड बॅरीअर तोडल्याने प्रचंड मोठा आवाज झाला, त्यावेळी अनेक घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, चिमण्या घाबरून उडाल्या इतकेच काय पण फ्रेंच ओपन टेनिस सामना सुद्धा थांबविला गेला. सोशल मीडियावर हल्ला झाल्याचे संदेश झळकू लागले आणि आपत्कालीन सेवा विभागाचा फोन सतत घणघणू लागला. पण सेना प्रवक्ते कर्नल स्टीफन स्पेर यांनी या अतिप्रचंड आवाजाबद्दल खुलासा केल्यावर परिस्थिती निवळली.

स्टीफन यांनी दिलेल्या माहितीनुसार अम्बेअर १४५ व फाल्कन ५० या दोन प्रवासी विमानांचा कंट्रोल टॉवर बरोबर संपर्क तुटला होता. त्यामुळे राफेल विमानाला साऊंड बॅरीअर म्हणजे आवाज मर्यादा तोडण्याची परवानगी दिली गेली. या प्रचंड आवाजामुळे प्रवासी विमानांच्या भोवती ढगांचा जो दाट थर होता तो हटविण्यास मदत झाली आणि या दोन्ही विमानांचा कंट्रोल टॉवरबरोबर संपर्क प्रस्थापित होऊ शकला. फाल्कन ३० ब्राझील विमान कंपनीचे विमान केपवर्ड कडून ब्रुसेल्स येथे जात होते तर दुसरे विमान स्थानिक उड्डाण करत होते.

सुपरसॉनिक फायटर विमानाच्या सॉनिक बूमचा आवाज जेव्हा ते विमान आवाज ऐकणाऱ्यापासून ६५ ते ८० किमी अंतरावरून जाते तेव्हाच ऐकू येतो. हा आवाज इतका तीव्र असतो कि त्यामुळे खिडक्यांच्या काचा तडकू शकतात.