युट्युबर साहिलच्या सुटकेसाठी कंगना सरसावली

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ठाकरे यांच्या संदर्भात काही विधाने करणाऱ्या फरीदाबाद येथील युट्यूबर् साहिल चौधरी याला मुंबई पोलिसांनी अटक करून गुपचूप मुंबईत आणल्याच्या बातमीने सोशल मीडियावर साहिलची मुक्तता करा या मागणीने जोर पकडला असून त्यात बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिनेही उडी घेतली आहे.

सोशल मीडियावर साहिलच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे सांगत अनेक युजर साहिलच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. कंगना राणावत हिने ट्विटरवरून साहिलच्या मागे उभे राहताना महाराष्ट्र सरकारला तिखट प्रश्न विचारले आहेत. कंगना लिहिते अनुराग कश्यप विरुध्द लैगिक शोषण केल्याचा एफआरआर पायल घोष हिने केल्याला चार दिवस झाले तरी त्याला अटक झालेली नाही. मात्र साहिलविरोधात कुण्या अनामिकाने एफआयआर दाखल केल्याचे सांगून त्याला मात्र फरीदाबाद येथे त्याच्या घरी जाऊन गुपचूप अटक करून मुंबईत आणले गेले आहे. त्याची त्वरित सुटका करावी.

साहिल उर्फ प्रदीप चौधरी या युट्यूबरला मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने हरियाना येथील त्याच्या घरी जाऊन अटक केली होती. सोशल मीडियावर त्याने महिलाविरोधी अवमानकारक साहित्य पोस्ट केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवला गेला असून अटक केल्यानंतर हे व्हिडीओ डीलीट करण्यात आल्याचे पोलीस सांगत आहेत. सोशल मिडियावरचे साहिलचे अकौंट ब्लॉक करून तपास सुरु असल्याचेही सांगितले जात आहे.