सर्वसामान्य माणसाची दानत, भुकेल्यांना देतोय धान्य

फोटो साभार नवभारत

करोना साथीमध्ये अनेकांच्या रोजगारावर संक्रात आल्याने दोन वेळचे जेवण मिळणे दुरापास्त झाले आहे. मात्र हैद्राबादमधील एक सर्वसामान्य नोकरदार रामू दोसापती अश्या गरजू लोकांसाठी स्वखर्चाने धान्य वाटप करत आहे. या काळात अनेक सरकारी आणि बिगरसरकारी संस्था अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढे आल्या असल्या तरी गरज फार मोठी आहे हे लक्षात घेऊन रामू दोसापती गरीब आणि बेसहारा लोकांसाठी राईस एटीएम चालवीत आहे. रामूचे हे एटीएम चोवीस तास सुरु आहे आणि आजपर्यंत गेल्या पाच महिन्यात त्याने १५ हजार लोकांची अन्न गरज पूर्ण केली आहे.

ज्या लोकांना खायला काही मिळालेले नाही ते रामू यांच्या घरासमोर असलेल्या किराणा दुकानात येऊन गरजेचे तांदूळ आणि अन्य किराणा माल नेतात. गेले १७० दिवस रामू अशी रेशन किट गरजूना देत आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून ५ लाख रुपये खर्च केले आहेत. आणि त्यांचे हे काम बघून त्यांच्या मदतीला अनेक हात आले आहेत.

रामू सांगतात, त्यांनी एक सुरक्षा रक्षकाला भुकेल्या मजुराला मदत म्हणून दोन हजार रुपये खर्च केल्याचे पाहिले तेव्हा त्यांच्या मनात आले, महिना सहा हजार मिळविणारा हा माणूस जर संकट काळात दोन हजाराची मदत देऊ शकतो तर महिन्याला १ लाख रुपये मिळविणारा मी फक्त घरच्या लोकांचा विचार कसा काय करू शकतो? त्यातून त्यांना ही कल्पना सुचली. रामू एमबीए झालेले असून सोफ्टवेअर कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून काम करत आहेत.