‘लॉकडाऊन काळातील तिकिटांचे पैसे त्वरित परत करा’ -सर्वोच्च न्यायालयाचे विमान कंपन्यांना आदेश


नवी दिल्ली: लॉकडाऊनच्या काळात रद्द करण्यात आलेल्या तिकिटांचे पैसे ग्राहकांना त्वरित परत करावेत. तसेच लॉकडाऊननंतर रद्द करण्यात आलेल्या तिकिटांचे पैसेही ३ आठवड्यात परत करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विमान कंपन्यांना दिले आहेत. या काळात रद्द केलेल्या तिकिटांचा परतावा न देणे ही मनमानी आहे, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात दि. २५ मार्च ते २४ मे दरम्यान ज्या प्रवाशांनी देशांतर्गत अथवा विदेशी प्रवासासाठी तिकीटे घेतली त्यांनी विमान उड्डाणांवर बंदी आल्याने आपली तिकीटे रद्द केली किंवा विमान कंपन्यांनी ती रद्द केली. त्यानंतर प्रवाशांना पैसे परत करण्यास टाळाटाळ करत कंपन्यांनी बंधने उठल्यावर प्रवास करण्यासाठी ‘क्रेडीट सेल’ उपलब्ध करू देण्याची तयारी दर्शविली. मात्र, लॉकडाऊनच्या काळात रद्द करण्यात आलेल्या तिकिटांचे रोख पैसे कंपन्यांनी तिकीट रद्द झाल्यापासू ३ आठवड्याच्या आत परत करावे आणि एजंटकडून घेतलेल्या तिकिटांचे पैसे तात्काळ परत करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

लॉकडाउनच्या काळात विमानप्रवासासाठी घेतलेल्या तिकिटांचे पैसे परत मिळावे यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी न्या. एन.व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आली.