लंडनच्या रस्त्यावर पसरली टनावारी गाजरं: नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता

लंडन: शहरातील रस्त्यावर टनावारी गाजरांचे ढीग पसरलेले पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांची उत्सुकता चांगलीच चाळवली गेली. या मागचे कारण काय असावे, या अस्वस्थेपोटी अनेकांनी ट्विटर आणि अन्य समाजमाध्यमातून त्या ढिगांची छायाचित्र आणि व्हिडीओ प्रसिद्ध केले आणि त्या मागच्या कारणांची विचारणा केली. समाजमाध्यमांवर या गाजरांची एवढी चर्चा झाल्यावर अखेर गोल्डस्मिथ विद्यापीठाने त्याचा खुलासा केला आहे.

विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातील एक भाग म्हणून ही गाजरे आणण्यात आली आहेत. विद्यापीठाचा एक काळात आणि विद्यार्थी राफेल पेरेझ इव्हान याने साकारलेले प्रतीकात्मक शिल्प आहे, असा खुलासा विद्यापीठाने समाजमाध्यमांद्वारे केला आहे.

या प्रतीकात्मक शिल्पातून ग्रामीण आणि शहरी भागातील भेद स्पष्ट करण्याचा प्रयत्न कलाकाराने केला आहे. अनेकदा सरकारच्या उदासीनतेचा निषेध म्हणून गाजरांसारखा शेतमाल शेतकरी शहरातील रस्त्यांवर आणून टाकतात. त्यापासून प्रेरणा घेऊन ही कल्पना सुचल्याचे इव्हानने सांगितले. हे ‘नकोशा’ गाजरांचे ढीग हे दुर्लक्षित ग्रामीण भागाचे प्रतीक आहे तर त्याच्या -पृष्ठभूमीवर असलेली विद्यापीठातील काचेची चकचकीत इमारत हे शहरी भागाचे प्रतीक! गाजरे हे निसर्गाचं प्रतीक आहे, तर काचेची इमारत हे मानवनिर्मित नागरीकरणाचे प्रतीक आहे. शहरातील माणूस निसर्गापासून तुटत आहे. आपली माती, वृक्षवेली, शुद्ध हवा यापासून दूर जात आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे इव्हानने सांगितले.

या प्रतिकात्मक शिल्पासाठी आणलेली तब्बल २९ टन गाजरे गोठ्यांमधील जनावरांना खाद्य म्हणून देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले. कार्यक्रम पार पडल्यानंतर विद्यापीठातील विद्यार्थी आणि नागरिकांनी या गाजराच्या ढिगांचा मनसोक्त आनंद लुटला अनेक विद्यार्थ्यांनी त्या ढिगावर बागडण्याची मजा घेत आपली छायाचित्र घेतली आहेत. काही जणांनी तर त्यातील चांगली गाजरं निवडून खाण्यासाठी घरीही नेली.