रवी किशन यांना आता ‘वाय प्लस’ सुरक्षा प्रदान-बोलले धन्यवाद महाराज जी


लखनौ: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर उघड झालेल्या बॉलिवूडच्या ‘ड्रग्ज कनेक्शन’मुळे चर्चांना उधाण आले आहे. हा विषय संसदेत लावून धरणारे भाजप खासदार रवी किशनही या काळात प्रसिद्धीच्या झोतात आले. रवी किशन यांना आता ‘वाय प्लस’ सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. रवी किशन यांनी त्याबद्दल ट्विट करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत.

बॉलिवूडच्या ‘ड्रग्ज कनेक्शन’बाबत संसदेत आवाज उठवल्यावर रवी किशन हे चर्चेचे केंद्र ठरले. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी त्यांच्यावर आगपाखड केली. ज्या थाळीत खातो त्याच थाळीचा छेद केल्याचा आरोप जया यांनी किशन यांच्यावर केला आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटीजनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यांच्याकडून फिल्म इंडस्ट्री बदनाम होत असल्याची टीका झाली.

या प्रकरणानंतर बॉलिवूडमधील अनेक कामे आपल्या हातातून निसटल्याचे किशन यांनी सांगितले. तसेच या प्रकाराला वाचा फोडल्याने आपल्या जीवाला धोका असल्याने आपल्याला अधिक सुरक्षा मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यानुसार उत्तर प्रदेश सरकारने त्यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा प्रदान केली आहे.