सातारा: आरक्षणाचा प्रश्न मराठा युवकांसाठी महत्त्वाचा असला तरी धीर सोडून टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन शिवरायांचे वंशज आणि भाजप खासदार उदयराजे भोसले यांनी केले आहे. आरक्षण नसल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नसल्याच्या नैराश्यातून बीड येथील विवेक रहाडे या युवकाने आत्महत्या केली आहे. उदयनराजे यांनी ट्विट करून त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच त्याच्या कुटुंबियांना धीर दिला आहे.
मराठा युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये: उदयनराजे
वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ पाहणारा बीड जिल्ह्यातील गरीब शेतकरी कुटुंबातील मराठा तरुण विवेक कल्याण रहाडे या बांधवाने आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली त्यांना आमच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या परिवारा सोबत आमच्या संवेदना आहेत. pic.twitter.com/YcCMi3Ee2r— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) October 1, 2020
युवक हे राष्ट्राचे भविष्य आहेत.भावनेच्या भरात टोकाचे पाऊल उचलून त्यांनी आत्महत्येसारखे कृत्य करणे हे समाज आणि राष्ट्राच्या दृष्टीनेही घातक ठरणार आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. आपल्या हक्कासाठी लढण्याला आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही. सध्या परिस्थिती प्रतिकूल असल्यासारखे वाटत असले तरी न्यायालयीन पातळीवर पूर्ण ताकदीने आपण लढा देत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली