एड्सवर विजय मिळविणाऱ्या व्यक्तीचा कॅन्सरने घेतला बळी

फोटो साभार झी न्यूज

एचआयव्ही एड्स या जीवघेण्या रोगातून संपूर्ण मुक्त होणारी जगातील पहिली व्यक्ती ठरलेला टीमाथी रे ब्राऊन अखेर कॅन्सरचा बळी ठरला. इंटरनॅशनल एड्स सोसायटीने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार ब्राऊनने दहा वर्षापूर्वी एचआयव्ही मधून पूर्ण बरे होऊन इतिहास घडविला होता आणि बर्लिन पेशंट या नावाने तो जगभर प्रसिद्ध होता.

वरील संस्थेच्या अध्यक्ष आदीबा कामरूलजमेन यांनी ब्राऊनचा परिवार, त्याचे डॉक्टर गेरो हटर यांनी एड्सवर उपचार शक्य आहेत आणि त्यातून पेशंट बरा होऊ शकतो हे जगासमोर आल्याबद्दल त्यांचे आभार मानताना वैज्ञानिकांनी या संदर्भात आणखी संशोधन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १९९५ मध्ये बर्लिनचा विद्यार्थी ब्राऊन याला तो एचआयव्हीची शिकार झाला असल्याचे समजले. त्यानंतर १० वर्षांनी त्याला रक्ताचा कर्करोग झाला तेव्हा त्याच्यावर स्टेम सेल ट्रांसप्लांट उपचार केले गेले. हे स्टेमसेल दुर्लभ जेनेटिक म्युटेशन असलेल्या डोनर कडून घेतले गेले होते. ही अवघड शस्त्रक्रिया झाल्यानंतर ब्राऊन २००८ साली या दोन्ही रोगातून पूर्ण बरा झाला होता. त्याने त्याचे अनुभव सर्वाना कळावेत यासाठी फौंडेशनची स्थापना करून एड्सवर उपचार आहेत याचे मी जिवंत उदाहरण आहे असे सार्वजनिकरित्या सांगितले होते. मात्र अखेरी त्याला पुन्हा रक्ताचा कर्करोग झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.