आरोपी नसतानाही पोलीस जप्त करू शकतात फोन?
फोटो साभार इनडीपेंडन्ट
सुशांत केस मध्ये अमली पदार्थ कनेक्शन अधिक महत्वाचे ठरू लागल्याने अमली पदार्थ विरोधी विभागाने अनेकांना चौकशी साठी बोलावल्याच्या बातम्या रोज येत आहेत. पैकी रिया आणि तिच्या भावावर आरोप ठेवले गेले असल्याने त्याचे फोन एनसीबीने जप्त केले आहेत. पण चौकशीसाठी बोलावलेल्या दीपिका, सारा, श्रद्धा कपूर यांचेही मोबाईल एनसीबीने जप्त केले असून आरोपी नसताना पोलीस असे फोन जप्त करू शकतात का असा प्रश्न विचारला जात आहे.
या प्रश्नांचे उत्तर हो असे आहे कारण कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कायदा सेक्शन १०२ नुसार पोलिसांना तसा अधिकार आहे. एनसीबी हा वेगळा विभाग असला तरी त्यानाही या कायद्याने हा अधिकार दिलेला आहे. पोलिसांना फोन तपासातून गुन्ह्यासंबंधी काही धागेदोरे मिळू शकतात असे वाटले तर आरोपी नसलेल्यांचे फोन जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. अर्थात फोन जप्त केल्यावर तसा अहवाल मॅजीस्ट्रेटला द्यावा लागतो. ज्याच्या फोन, लॅपटॉप, डायरी मधून गुन्ह्याचे धागेदोरे मिळतील अशी शंका असेल तर ती व्यक्ती आरोपी असो वा नसो, किंवा साक्षीदार असो वा नसो त्यांचे फोन जप्त करता येतात. पण पोलिसांना त्यातील डेटा लिक मात्र करता येत नाही.
या क्षेत्रातील जाणकारांच्या मते प्रत्येकाला खासगी स्वातंत्र आहे त्यामुळे समजा कुणाचा फोन पोलिसांनी जप्त केला असेल तर तो नंतर त्याला परत केला जातो. मात्र परत देताना त्यातील डेटा लिक झालेला नाही हे पाहणे पोलिसांची जबाबदारी असते. संबंधित व्यक्तीला त्याच्या फोन मधील डेटा पब्लिक डोमेन मध्ये आलेला दिसला तर ती व्यक्ती पोलीसविरुद्ध थेट न्यायालयात दावा दाखल करू शकते.