.. आता म्हणणार का ‘नमस्ते ट्रम्प’? पी. चिदंबरम यांचा सवाल


अमेरिकेचे अध्यक्ष आणि आगामी निवडणुकीतील रिपब्लिक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना महासाथीबाबत भारताच्या विश्वासार्हतेवर शिंतोडे उडविल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ या मेळाव्याची खिल्ली उडवली आहे. ‘… आता म्हणणार का ‘नमस्ते ट्रम्प? आता करणार का प्रिय मित्राच्या स्वागतासाठी मेळाव्याचे आयोजन?’ अशा अर्थाचे सवाल करणारे ट्विट त्यांनी केले आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूक प्रचाराचा एक भाग असलेल्या दोन्ही उमेदवारांच्या जाहीर वादविवादादरम्यान ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यात दोन वेळा भारताचा नकारात्मक उल्लेख केला आहे. कोरोनाबळी लपविणाऱ्या देशांमध्ये त्यांनी चीन आणि रशियाच्या पंक्तीत भारताला बसविले आहे. त्याचप्रमाणे जगभरात प्रदूषण पसरविणाऱ्या देशातही त्यांनी चीन आणि रशियाच्या जोडीने भारताचा समावेश केला.

ट्रम्प यांनी कोरोनाची महासाथ जगभरात पसरण्यास चीनला जबाबदार धरले आहे. या महासाथीने आतापर्यंत जगभरातील १० लाख रुग्णांचा बळी घेतला आहे. जगात कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटीहून अधिक आहे. चीनच्या वूहान शहरातून कोरोनाचा विषाणू जगभरात पसरला. या विषाणूबाबत चीनने जगाला अंधारात ठेवल्याचा आरोप अमेरिका, ऑस्ट्रेलियासह जगभरातील अनेक देशांनी केला आहे. चीन आणि रशियासह भारत आपल्या देशातील कोरोनाबळींची खरी आकडेवारी दडवत असल्याचाही ट्रम्प यांचा आरोप आहे.