नवी दिल्ली: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक ५ साठी मार्गदर्शक सूत्र जारी केली आहेत. त्यानुसार लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले आहेत. सिनेमागृह, नाट्यगृह उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्यांनी आपापल्या स्थानिक परिस्थितीनुसार घेणे अपेक्षित आहे. अनलॉक ५ ची सूत्र आजपासून लागू करण्यात आली असून ती ३१ ऑकटोबरपर्यंत लागू असणार आहेत.
अनलॉक ५: सिनेमागृह उघडणार, शाळांबाबतचा निर्णय राज्यांकडे
सिनेमागृह आणि नाट्यगृह दि. १५ ऑकटोबरपासून सुरू करता येणार आहेत. मात्र, त्यासाठी एकूण क्षमतेच्या निम्म्या संख्येने प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येईल. याबद्दलच्या स्वतंत्र मार्गदर्शक सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जारी केल्या जातील. तब्बल ७ महिन्यांपासून सिनेमा, नाट्यगृह बंद आहेत.
राज्यांना उचित वाटल्यास दि. १५ पासून शाळा, महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्था सुरू करता येणार आहेत. मात्र, ऑनलाईन शिक्षणाची सुविधा सुरूच ठेवण्यात यावी आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संस्थेत जाण्याऐवजी ऑनलाईन शिक्षण घ्यायचे असेल त्यांना त्यासाठी मुभा असावी. विद्यार्थ्यांवर उपस्थितीची सक्ती नसावी, असे निर्देश गृह मंत्रालयाने दिले आहेत.
व्यावसायिक प्रदर्शने आणि मेळावे यांना मुभा असेल. मात्र, त्यांच्या आयोजनासाठी व्यापार मंत्रालयाकडून जारी कारण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
खेळाडूंना प्रशिक्षण देणारे जलतरण तलाव दि. १५ पासून क्रीडा मंत्रालयाच्या सूचनांनुसार सुरू करता येतील. बागा, एंटरटेनमेंट पार्क्ससारखी ठिकाणे आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांच्या अधीन राहून उघडता येतील.
नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर १०० जणांच्या मेळाव्यांना दि. १५ पासून मान्यता देण्यात आली आहे. ही संख्या राज्य आपल्या अखत्यारीत वाढवू शकतात.
आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.