ऑगस्टमध्ये 10 वर्षांवरील दर 15वी व्यक्ती कोरोनाने संक्रमित, सीरो सर्वेक्षणात दावा

देशात ऑगस्ट महिन्यापर्यंत 10 वर्षांवरील प्रत्येकी 15 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती कोरोना व्हायरसच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (आयसीएमआर) आपल्या दुसरे सिरो सर्वेक्षणात याबाबतचा खुलासा केला आहे. आयसीएमआरचा पहिले देशव्यापी सर्वेक्षण 11 मे ते 4 जून दरम्यान करण्यात आले होते. यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण 0.73 टक्के होते.

दुसरे सिरो सर्वेक्षण 17 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले. दुसरे सर्वेक्षण देखील पहिल्या सर्वेक्षणात समावेश असलेल्या 21 जिल्यातील 70 जिल्ह्यांमधील 700 गाव आणि वार्डातच करण्यात आले. यासाठी 29,082 लोकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. वयोगटा व्यतिरिक्त दोन्ही सर्वेक्षणात अन्य मापदंड समान होते. पहिल्या टप्प्यात 18 वर्षांवरील व्यक्तीचा समावेश होता. तर दुसऱ्या सर्वेक्षणात 10 वर्षांवरील लोकांचे नमुने घेण्यात आले.

आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, आम्ही दुसऱ्या सर्वेक्षणात वयोगटाला बदलून 18 वर्षावरून 10 वर्ष केले. कारण कमी वयाच्या लोकांमध्ये देखील संक्रमण आढळले होते. आकड्यांनुसार, शहरी भागातील झोपडपट्टयांमध्ये 15.6 टक्के आणि अन्य शहरी भागांमध्ये 8.2 टक्के संक्रमित आढळले.  तर ग्रामीण भागात 4.4 टक्के लोक कोरोना संक्रमित आढळले. 18 वर्षांवरील व्यक्तीमध्ये याचे प्रमाण 7.1 टक्क्यांपेक्षा अधिक होते.

नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. वीके पॉल म्हणाले की, लोकसंख्येचा एक मोठा भाग संक्रमणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असल्याचे दिसते. त्यामुळे मास्क घालणे, सोशल डिस्टेंसिंग पाळणे आणि हात धुवणे या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.