‘बरे झाले असते जर हाथरसच्या बलात्कार पीडितेला…’, पायल घोषचे समर्थन करणाऱ्या आठवलेंना स्वरा भास्करचा टोला

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला आहे. रामदास आठवले यांनी अनुराग कश्यपविरोधात अत्याचाराचा आरोप करणाऱ्या पायल घोषला समर्थन दिले आहे. हाथरस सामुहिक बलात्कार पीडिता आणि तिच्या कुटुंबाला समर्थन दिले असते तर अधिक चांगले झाले असते, असे म्हणत स्वराने आठवलेंना टोला लगावला आहे.

स्वरा भास्करनेने एक ट्विट रिट्विट केले आहे, ज्यात पायल घोष ही रामदास आठवले, वकील नितीन सातपुते आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दिसत आहे. यावरून निशाणा साधत स्वरा भास्कर म्हणाली की, मंत्री आठवलेंनी हाथरस सामुहिक बलात्कार पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला हेच समर्थन दिले असते तर अधिक बरे झाले असते.

काल पायल घोषने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी रामदास आठवले देखील उपस्थित होते. या भेटीत पायल घोषने आपल्या जीवा धोका असल्याचे सांगत वाय दर्जाची सुरक्षा देण्याची देखील मागणी केली. यावरून स्वराने टोला लगावला आहे.

दरम्यान, पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून, अनुरागला चौकशीसाठी पोलिसांनी समन्स बजावले आहे.