हाथरस गँगरेप : मोदींनी केली योगी आदित्यनाथांशी चर्चा, कठोर कारवाई करण्याचे दिले आदेश

हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणामुळे पुन्हा एकदा देश हदरला आहे. देशभरातून संताप व्यक्त केला जात असून, या प्रकरणात 4 आरोपींना  अटक करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसआयटीची स्थापना केली आहे.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी यांनी याबाबतची माहिती ट्विट करत दिली.

या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आले असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचे आदेश देखील दिले आहे. प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेली समिती 7 दिवसात अहवाल देणार आहे.

दरम्यान, 14 सप्टेंबरला हाथरस जिल्ह्यातील गावात युवतीसोबत ही घटना घडली. यावेळी तिला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला गेला. काल सफदरजंग येथील हॉस्पिटलमध्ये अखेर उपचारा दरम्यान पीडितेचा मृत्यू झाला.