एकेकाळी एलआयसी एजेंट होता हा उद्योगपती, आता श्रीमंतांच्या यादीत मिळवले स्थान

आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2020 मध्ये अनेक भारतीय उद्योगपतींनी स्थान मिळवले आहे. मात्र यातील एका नावाने सर्वांना आश्चर्यचकित केले. यावेळी सोनालिका ट्रॅक्टरचे मालक लक्ष्मण दास मित्तल यांनी श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवले आहे. आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2020 मध्ये लक्ष्मण मित्तल 164 व्या स्थानावर आहेत. या यादीत 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असणाऱ्यांना स्थान दिले जाते. रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी या यादीत टॉपवर असून, त्यांची संपत्ती 6,58,400 कोटी रुपये आहे.

श्रीमंतांच्या या यादीत एकूण 828 भारतीयांना स्थान मिळाले आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर हिंदुजा ब्रदर्स आहे. हिंदुजा ब्रदर्स यांची संपत्ती 1,43,700 कोटी रुपये आहे. तर 1,41,700 कोटी रुपये संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर एचसीएलचे संस्थापक शिव नाडर आहेत. उद्योगपती गौतम अडाणी हे 1,40,200 कोटी संपत्तीसह चौथ्या स्थानावर तर पाचव्या स्थानावर अजीम प्रेमजी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1,14,400 कोटी रुपये आहे.

सोनालिका ग्रुपचे चेअरमन लक्ष्मण दास मित्तल हे आज देशातील 164 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 89 वर्षीय लक्ष्मण दास मित्तल यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले आहे. पंजाबच्या होशियारपुर येथे राहणाऱ्या मित्तल यांनी 1962 मध्ये थ्रेसर बनवण्यास सुरुवात केली. त्याआधी ते एलआयसी एजेंट होते. सुरुवातीला हा व्यवसाय तोट्यात गेल्याने त्यांच्या वडिलांना रडू कोसळले. मात्र मित्तल यांनी पुन्हा थ्रेसर बनविण्यास सुरुवात केली व 1969 मध्ये सोनालिका ग्रुपची सुरूवात केली. आज सोनालिका ग्रुप भारतातील तिसरी सर्वात मोठी ट्रॅक्टर बनविणारी कंपनी आहे.