हाथरस प्रकरण : योगीजींवर पुर्ण विश्वास, आम्हाला ‘त्या’ घटनेप्रमाणेच न्याय हवा – कंगना


प्रत्येक मुद्यावर आपले मत मांडणारी अभिनेत्री कंगना राणावतने आता हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणावर देखील मत मांडले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांचा जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असा उल्लेख करणाऱ्या कंगनाने मात्र, या घटनेनंतर देखील आपल्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर पुर्ण विश्वास असल्याचे म्हटले आहे. सोबतच प्रियंका रेड्डीच्या गुन्हेगारांना जशी शिक्षा दिली होती, तशीच या प्रकरणातील आरोपींना शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

कंगनाने ट्विट करत हाथरस प्रकरणात ‘भावनिक, स्वाभाविक आणि आवेगपुर्ण न्याय’ मिळावा असे म्हटले आहे. कंगनाने ट्विट केले की, मला योगी आदित्यनाथ यांच्यावर पुर्ण विश्वास आहे. ज्याप्रमाणे प्रियंका रेड्डीच्या बलात्काऱ्यांना त्याच ठिकाणी मारले होते, जेथे त्यांनी बलात्कार केला होता व जिंवत जाळले होते. आम्हाला त्याचप्रमाणे भावनिक, स्वाभाविक आणि आवेगपुर्ण न्याय हाथरस घटनेत हवा आहे.

नोव्हेंबर 2019 मध्ये हैदराबाद येथे पशुवैद्यकीय डॉक्टर प्रियंका रेड्डीवर बलात्कार करण्यात आला होता व तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या घटनेतील आरोपींना चकमकीत ठार करण्यात आले होते.

दरम्यान, हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आले असून, या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.