आता रिलायन्स रिटेलमध्ये ‘ही’ कंपनी करणार 3,675 कोटींची गुंतवणूक

जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवल्यानंतर आता मुकेश अंबानी रिटेल कंपनीसाठी निधी उभारत आहेत. रिलायन्स रिटेलला आता तिसरा गुंतवणूकदार मिळाला आहे. इक्विटी फर्म कंपनी जनरल अटलांटिक कंपनीत 0.84 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. कंपनी रिलायन्स रिटेमध्ये जवळपास 3,675 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. या करारासाठी रिलायन्स रिटेलचे प्री-इक्विटी मुल्य 4.285 लाख कोटी रुपये एवढे आहे. या कंपनीची रिलायन्समध्ये दुसऱ्यांदा गुंतवणूक आहे. याआधील जनरल अटलांटिकने जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 6598.38 कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती.

याआधी सिल्वर लेकने रिलायन्स रिटेलमध्ये 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती. कंपनीने रिलायन्स रिटेलची 1.75 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. अमेरिकेच्या केकेआर कंपनीने देखील रिलायन्स रिटेलमध्ये 5550 कोटी रुपये गुंतवले आहेत.

जनरल अटलांटिकच्या या गुंतवणुकीबाबत मुकेश अंबानी आणि रिलायन्स रिटेलच्या संचालक ईशा अंबानी यांन देखील आनंद व्यक्त केला. मुकेश अंबानी म्हणाले की, जनरल अटलांटिकसोबत आमचे संबंध अधिक दृढ झाल्याचा मला आनंद आहे. आम्ही व्यापारी आणि ग्राहकांना सशक्त करण्याचे आणि शेवटी भारतीय रिटेल क्षेत्राला बदलण्याचे काम करत आहोत.

जनरल अटलांटिकचे सीईओ बिल फोर्ड या गुंतवणुकीविषयी म्हणाले की, जनरल अटलांटिक देशातील रिटेल क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याच्या मुकेश अंबानीच्या कार्याला पाठिंबा देते. जनरल अटलांटिकला रिलायन्स इंडस्ट्रीजवर पुर्ण विश्वास आहे. रिलायन्सबरोबर भागीदारी करणे हा आमचा सन्मान आहे.