बाबरी प्रकरण : विध्वंस सुनियोजित नव्हता, आडवाणींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

28 वर्ष जुन्या बाबरी विध्वंस प्रकरणात आज लखनऊच्या स्पेशल सीबीआय न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह आणि नृत्यगोपाल दाससह 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

न्यायालयाने म्हटले की, बाबरी विध्वंस सुनियोजित नव्हते. अराजक घटकांनी हा ढाचा पाडला व आरोपी नेत्यांनी या लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले की, आरोपींच्या विरोधात ठोस पुरावे नाही आणि सीबीआयकडून सादर करण्यात आलेले ऑडिओ आणि व्हिडीओच्या पुराव्यांची प्रामाणिकता तपासता येत नाही. भाषणाचे ऑडिओ क्लियर नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

या प्रकरणात आरोपी म्हणून लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि कल्याण सिंह सारख्या भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश होता. चार्जशीटमध्ये एकूण 49 लोकांच्या नावाचा समावेश होता, ज्यातील 17 जणांचे निधन झाले आहे. सुनावणीच्या वेळी लालकृष्ण आडवाणी आणि जोशी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे सहभागी झाले होते.

दरम्यान, स्पेशल सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एसके यादव यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. ते 30 सप्टेंबर 2019 ला निवृत्त होणार होते. मात्र या प्रकरणासाठी त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता.