या अजब कारणांसाठी सुद्धा घेता येतो विमा

फोटो साभार कंपेअर पॉलिसी

आपल्याला सुरक्षा कवच म्हणून आरोग्य, प्रवास, अपघात, घर, कार किंवा अन्य मौल्यवान वस्तूंसाठी विमा कवच घेता येते याची माहिती असेलच. पण आपण कधी विचार केला नसेल अश्या अनेक गोष्टीसाठीही विमा घेता येतो याची माहिती नसेल तर हे जरूर वाचा.

विवाह विमा योजना या बद्दल आपण ऐकले असेल. पण यात कोणकोणत्या बाबी कव्हर करता येतात याची माहिती तुम्हाला आहे का? नसेल तर ऐका. लग्नापूर्वी अनेकदा वधू किंवा वराने पलायन केल्याच्या कथा आपण ऐकतो. अश्या वेळी लग्न सजावट, जेवण व अन्य खर्च केलेल्या रकमेचा दावा विमा कंपनीकडे करता येतो. विवाह विमा संबंधी अनेक पॉलिसी आहेत आणि काही विमा कंपन्या तुमच्या गरजेनुसार विविध पॅकेज सुद्धा देतात. लग्न रद्द होणे, दागिने चोरी, लग्नानंतर त्वरित अपघात, अचानक लग्न थांबणे अशा तमाम समस्या साठी विमा पॉलिसी घेता येते.

लग्न रद्द झाल्यास हॉल, रिसोर्ट बुकिंगसाठी भरलेले पैसे, प्रवास कंपनीला आगावू दिलेले पैसे, अन्य सजावट, लग्नपत्रिका पेमेंट अगदी संगीत कार्यक्रमासाठी दिलेला अॅडव्हांस सुद्धा विमा कव्हर मध्ये समाविष्ट करता येतो.

फ्लोरिडा येथे मुख्यालय असलेली सेंट लॉरेन्स एजन्सी तर परग्रहवासीयांनी अपहरण केले तरी विमा कव्हर देते. जगभरात या कंपनीचे २० हजार विमाधारक आहेत. लंडनची लॉर्ड्स कंपनी कस्टमाईज पॉलिसी देते. त्यात भूत प्रेत निवारण संदर्भातली जोखीम घेणाऱ्या व्यक्ती, कायदेशीर पॅरानॉर्मल सोसायटीज विमा कवर घेऊ शकतात. इतकेच कशाला आपल्या कौन बनेगा करोडपतीसाठी बक्षिसाची रक्कम शो निर्माते नाही तर विमा कंपन्या देतात. कारण करोडो रुपये जिंकणाऱ्याची जबाबदारी वाढते आणि मग तो त्या संपत्तीसाठी विमा कव्हर घेऊ शकतो.