मुकेश अंबानी यांची लॉकडाऊन काळात दर तासाला ९० कोटींची कमाई

फोटो साभार बिझिनेस इनसायडर

गेले सहा महीने करोना मुळे देशातील अनेक आर्थिक व्यवहार आणि उद्योग ठप्प झाले असतानाचा रिलायंस उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मात्र या काळात दर तासाला सरासरी ९० कोटी रुपयांची कमाई केल्याचे हुरून इंडिया व आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंटच्या ताज्या अहवालातून सिद्ध झाले आहे. आयआयएफएल हुरून इंडिया रिच लिस्ट २०२० ची यादी नुकतीच प्रकाशित झाली आहे. या नवव्या एडीशन मध्ये ३१ ऑगस्ट पर्यंत १ हजार कोटी किंवा त्यापेक्षा अधिक कमाई केलेल्या भारतीय धनकुबेरांची यादी दिली गेली आहे. त्यात रिलायंसचे मुकेश अंबानी सलग ९ व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत. त्याची या काळातील एकूण कमाई ६,५८,४०० कोटी असून गेल्या १२ महिन्यात त्यात ७३ टक्के वाढ झाली आहे.

या यादीत एकूण ८२८ श्रीमंत आहेत. ६३ वर्षीय मुकेश यांनी लॉकडाऊनच्या काळात म्हणजे मार्च ते ऑगस्ट या काळात ताशी सरासरी ९० कोटींची कमाई केली असून ते आशियातील सर्वात श्रीमंत तर जगातील चार नंबरचे श्रीमंत बनले आहेत. लंडन स्थित हिंदुजा ब्रदर्स या यादीत दोन नंबरवर असून त्यांची संपत्ती १,४३,७०० कोटी आहे. या यादीत तिसऱ्या नंबरवर एचसीएलचे संस्थापक शिव नाडर, चार नंबर वर गौतम अडाणी, पाच नंबरवर अजीज प्रेमजी आहेत. पहिल्या दहा मध्ये राधाकिशन दमाणी, सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला, कोटक महिन्दचे उदय कोटक, सन फार्माचे दिलीप संघवी, शापूरजी पालनजीचे सायरस मिस्री आणि शापूर मिस्री यांचा समावेश आहे.